Sunday, March 03, 2013

पाला’वरचं चिकन

हिंदुस्थानी बैठक, झणझणीत जुन्नरी चिकन रस्सा, आळणी चिकन, चिकन मसाला, ज्वारी, बाजरीची भाकरी, चपाती, जोडीला कांदा अन् लिंबू असं पोटभर जेवण, तेही हॉटेल आणि ढाब्याच्या तुलनेत अगदीच स्वस्त. ग्रामीण ढंगाची अवीट चव असलेले जुन्नर तालुक्यातील पूर्वभागातील बेल्हे गावच्या ‘पालांवरचं चिकन’ पुण्या-मुंबईसह ग्रामीण भागातील खवैयांच्या तोंडाला पाणी आणत आहे.


मुंबई-विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गावर आळेफाट्यापासून पूर्वेकडे १५ किमी अंतरावर असलेल्या बेल्हे हे गाव राज्यातील एक प्रमुख बैल बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे ७० वर्षांपूर्वी दर सोमवारी बैल बाजार सुरू झाला. या बाजारात येणार्‍या लोकांसाठी ‘पालं’ लावून जेवण बनविणे सुरू झाले. ते आजतागायत सुरू आहे. बाजारात येणार्‍या शेतकर्‍यांना कमीत कमी दरात सर्वोत्तम गुणवत्तेची सेवा देण्याची परंपरा आम्ही पुढे नेत असल्याचे अशोक हिंद खानावळीचे मालक बबनराव बांगर सांगतात.

मांसाहारी जेवणासह शाकाहारी जेवणाची सोय असलेली ही ‘पालं’ दर रविवार आणि सोमवारी सुरू असतात. हा बैल बाजार असल्याने येथे फक्त चिकनच जेवणात दिले जाते. खास जुन्नरी पद्धतीचा घरगुती मसाला, रश्श्याला घट्टपणा येण्यासाठी भाजलेला कांदा, आले, कोथिंबीरची दगडी पाट्यावर वाटून केलेली पेस्ट वापरण्यात येते. चुलीवरची खरपूस भाकरी असल्याने जेवण्याची लज्जत वाढते. खाणार्‍याला लागेल तेवढा रस्सा देण्यात येतो. हिंदुस्थानी बैठकीमध्ये जेवणासाठी एका वेळी तीस ते चाळीस लोक जेवायला बसतात. त्यामुळे जेवताना घरात बसून घरचे जेवल्यासारखं वाटतं. पोटभर जेवण झाल्यांनतरही रश्याच्या फुरका मारण्याचा मोह आवरत नाही.

सौजन्य - अमोल कुटे, फुलोरा, सामना  0२० ३१ ३ 

No comments: